नवी दिल्ली: आयपीएलच्या 13व्या मोसमासाठी दुबईत दाखल झालेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनाने व्यक्तिगत कारणासाठी आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्सला दुसरा झटका बसला आहे. दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यानेही वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नई संघाच्या ताफ्यात कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची संख्या वाढल्यामुळे संघातील खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळेच रैनाने माघार घेतल्याचीही चर्चा होती. मात्र रैनाच्या काकांची हत्या झाली होती. तेही कारण बोलले जात आहे.
चेन्नईच्या संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू असलेल्या हरभजनने माघार घेतल्याने धोनीची चिंता वाढली आहे. 2018मध्ये भज्जी चेन्नई संघाचा सदस्य झाला. त्याने 2018 व 2019 च्या मोसमात 24 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये एकूण त्याने 160 सामन्यांत 150 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल 2020साठी चेन्नई सुपर किंग्सने चेन्नईत आयोजित केलेल्या सराव शिबिरातही भज्जी सहभागी झाला नव्हता. भज्जीने माघार घेतल्यास संघाला तयार राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. ”त्याने अजूनही अधिकृतपणे काहीच कळवलेलं नाही. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या आम्हाला त्याचं उत्तर अपेक्षित आहे. पण, त्यानं न खेळण्याचा निर्णय घेतल्यास, संघ व्यवस्थापनाला त्या परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे,” असे सूत्रांनी सांगितले.