हार्दिक पांड्या, के. एल. राहुलच्या जागी विजय शंकर आणि शुभमन गिल स्थान

0

मुंबई: कॉफी विथ करण शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे निलंबित करण्यात आलेल्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्या जागी भारतीय संघात विजय शंकर आणि शुभमन गिल यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्यासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली आहे. तर त्यापुढील न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय शंकरला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंड दौऱ्यासाठीही त्याची संघात निवड करण्यात आली आहे. तर न्यूझीलंडमधील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे.

विजय शंकर आतापर्यंत भारतीय संघाकडून पाच टी-20 सामने खेळला आहे. त्यात त्याने तीन विकेट घेतले आहे. याशिवाय तो ४१ प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. त्याच्या नावावर १६३० धावा आणि ३२ विकेट्स जमा आहेत. तर शुभमन गिलने २०१८ मध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती. तो न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण करेल.

२०१८ मध्ये शुभमन गिल कोलकात्याच्या संघाकडून आयपीएल खेळला होता. त्यात त्यानं चांगली कामगिरी केली होती. शुभमन पंजाबकडून प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. २०१८-१९ च्या रणजीत तामिळनाडूच्या संघाविरुद्ध २६८ धावांची शानदार खेळी साकारली होती. या स्पर्धेत त्यानं पाच सामन्यात तब्बल ७२८ धावा फटकावल्या. त्यात दोन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.