हाथरस: बहुचर्चित हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. दरम्यान सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त केली आहे. हाथरसमध्ये झालेल्या या घटनेननंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. देशभरात आंदोलने होत आहेत. भाजप सरकारवर आरोप देखील या घटनेवरून होताना दिसत आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर प्रचंड टीका झाली. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती. त्यामुळे योगी सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. काल शनिवारी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते, त्यानंतर आज सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हाथरस प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी याचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मागणीची दखल घेत योगी सरकारनं हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. केंद्रानं शनिवारी सीबीआयकडे तपास सोपवला. त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चौकशी टीमही नियुक्त केली आहे.
हाथरस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयकडून माहिती देण्यात आली. एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे, असं सीबीआयनं म्हटलं आहे. यापूर्वी पीडितेच्या भावानं या प्रकरणात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. हाथरसमधील चंदपा ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे. सामूहिक बलात्कार व हत्येच्या या घटनेला २७ दिवस लोटल्यानंतर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. यापूर्वी हाथरस पोलीस त्यानंतर एसआयटी याप्रकरणाची चौकशी करत होती.