उदयनराजेंचा भाजपाला घरचा आहेर

0

सातारा: राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून, शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत साताऱ्याचे माजी खासदार, भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचे नेतृत्त्व आम्ही करु असे म्हटले आहे. परतीच्या पावसाने ग्रामीण भागात जे नुकसान झाले आहे, त्यासंदर्भात एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवत शेतकऱ्यांना त्वरित मदत करा अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे. नैसर्गिक संकटामुळे कोलमडलेल्‍या बळीराजाला शासनाने योग्‍य ती मदत देऊन धीर द्यावा असं निवेदन राज्यपालांना देण्यात आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांची मागण्याची पूर्तता झाली नाही तर, शेतकऱ्यांचा असंतोष उफाळेल. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होईल. अशावेळी शेतकऱ्यांच्या असंतोषाचं नेतृत्त्व वेळप्रसंगी आम्हाला करावं लागेल असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. उदयनराजे यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. आम्ही दहा वर्षांपासून करत असलेली विमा योजनेची अंमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्यांना मदतीसाठी हात पसरावे लागले नसते, असं उदयनराजे म्हणाले.

शेतकऱ्यांचा असंतोष हा कायदा-सुव्यवस्‍था पाळण्याच्या पलीकडे असेल, त्‍यावेळी आम्‍हाला रयतेबरोबर-जनतेबरोबर रहावे लागेल. आता तरी “देरसे आये लेकिन दुरुस्‍त आये” या म्‍हणी प्रमाणे शेतक-यांच्या उत्‍पन्नाला, अस्‍मानी व सुलतानी संकटापासून संरक्षण देण्यासाठी जगातील जपान-अमेरिका- ब्राझिल आदी प्रगत देशाप्रमाणे ईर्माचा कायदा करावा व त्‍याची कार्यवाही सुरु करावी. जीवाभावाच्या शेतकऱ्यांसाठी आम्‍ही सदैव राहणार असून, त्‍यांनी धीर सोडू नये असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे.