आरोग्य तपासणी शिबिराने वाहन चालक भारावले

0

मुक्ताईनगर- वाहन तपासणी नाक्यावर कागदपत्रांची होणारी तपासणी तशी नित्याचीच बाब मात्र चालकांचे आरोग्य उत्तम व सुदृढ राहण्यासाठी रस्ता सुरक्षा पंधरवडा उपक्रमांतर्गत तालुक्यातील कर्की प्रादेशिक परीवहन तपासणी नाक्यावर चालकांसाठी चक्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने वाहन चालकही भारावले. 56 वाहन चालकांसह मालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना आरोग्याबाबत सल्लाही देण्यात आला.

उपक्रमाबाबत समाधान
रस्ता सुरक्षा अभियान 2018 अंतर्गत उपप्रादेशिक परीवहन विभाग जळगाव व धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 28 एप्रिल ते 5 मे दरम्यान सुरक्षा पंधरवडा उपक्रमात सीमा तपासणी नाक्यावर वाहन चालक व मालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृती उपक्रम राबविले जात आहे याचाच भाग म्हणून कर्की सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य शिबिर लावण्यात आले होते.

शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ.एन.जी.मराठे यांनी 56 रुग्णांची आरोग्य तपासणी व रुग्णांना समुपदेशन केले. त्यांना डॉ.सुरेश पाटील, डॉ.वैभव पाटील यांनी सहकार्य केले. प्रसंगी रुग्णांचे रक्त तपासणी, ईसीजी ही विनामूल्य करण्यात आले.

10 रुग्णांना रक्त शर्करा
वाहन चालकांच्या आरोग्य तपासणी बाबत माहिती देताना डॉ.एन.जी.मराठे म्हणाले 56 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील बहुसंख्य वाहन चालक तर काही मालक व क्लीनर होते. धक्कादायक बाब म्हणजे जागीच रक्त शर्करा तपासणी केली असता तब्बल 10 वाहन चालकांना रक्तशर्करा निघाली तर आठ वाहन चालकांना उच्च रक्तदाब निघाला. ही बाब चिंताजनक म्हणावी लागेल तर अन्य तीन ते चार रुग्णांमध्ये घसा श्‍वसन विकार दिसून आले.

वाहन चालक म्हटलं म्हणजे लैंगिक, गुप्त रोग, त्वचाविकार असा बहुतांश अनुभव परंतु या पेक्षा आता रक्तदाब व डायबेटीसचे अधिक प्रमाण दिसून येणे चिंताजनक आहे. शारीरिक श्रमाचा अभाव व एकाच जागेवर अनेक तास बसून वाहन चालविणे यामुळे व्याधी जडतात. त्याकरीता वाहन चालकांनी आरोग्याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी समुपदेशन व मार्गदर्शनात केले. यावेळी परीवहन विभागाचे वाहन निरीक्षक परीक्षीत पाटील व सुनील देशमुख यांच्यासह सहकार्‍यांनी परीश्रम घेतले.