न्यायालयात एकाच दिवशी १०० प्रकरणांची सुनावणी

0

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका न्यायमूर्तींकडून एकाच दिवसात १०० प्रकरणांची सुनावणी झाली आहे. या मॅरेथॉन सुनावणीसाठी न्यायालय शनिवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती. जे. एस. कथावाला यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता कोर्ट नंबर २० मध्ये विविध प्रकरणांच्या सुनावणीला सुरुवात केली होती. या एका दिवसात तातडीच्या एकूण १०० प्रकरणांची सुनावणी काथावाला यांच्याकडून घेण्यात आली.

ऐरवी संध्याकाळी ५ नंतर उच्च न्यायालयाचे बहुतांश कामकाज हे थांबते. मात्र, शुक्रवारी जस्टीस कथावाला यांच्या दालनात सकाळी १० वाजल्यापासून ते शनिवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत ज्येष्ठ वकील, याचिकाकर्ते आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग काम करताना पाहायला मिळाला.

दिवसभरात न्या. कथावाला यांनी केवळ २० मिनिटांचा लंच ब्रेक घेतला. सुनावणी घेण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये ७० महत्वाच्या आणि तातडीच्या याचिकांचा समावेश होता. ज्यात मालमता प्रकरणे, आर्थिक प्रकरणे या सारख्या याचिकांचा समावेश होता. न्या. कथावाला यांनी घेतलेल्या या मॅरेथॉन सुनावणीचे मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांनी स्वागत केले आहे.