रत्नागिरीत मुसळधार पाऊस

0

रत्नागिरी- जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे जनतेची तारांबळ उडाली. तसेच आंबा पीकही यामुळे धोक्यात आले आहे. जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीतही पावसाचा शिडकावा झाला होता. त्यातच उष्णतेचा पाराही वाढल्याने गर्मीने जनता त्रस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस पडणार अशी शक्यता होती.

सकाळपासूनच रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, लांजा, राजापूरमध्ये ढगाळ वातावरण होते. पावसाचे वातावरण तयार झाले होते. अखेर लांजा तालुक्यात सकाळी सव्वाआठच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

अर्धतासांहून अधिक वेळ मुसळधार पाऊस पडत होता. दहा वाजले तरी पाऊस पडत होता. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. कारण सध्या बेगमीची कामं सुरु आहेत आणि अशातच पावसाने हजेरी लावल्याने जनतेची त्रेधातिरपीट उडाली.

या पावसामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. कारण ऐन आंबा सिझन सुरु असतानाच पाऊस पडल्याने आंब्याचे दर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.