थिरुअनंतपूरम-केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून जवळपास निम्म्यापेक्षा अधिक राज्य पाण्याखाली गेले आहे. अनेक ठिकाणी महामार्गाचे काही भाग कोसळले असून, अनेक घरे वाहून गेली आहेत. ५४ हजार लोक बेघर झाले आहेत, तर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. इडुक्की व आजूबाजूच्या जिल्हय़ांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. इडुक्की धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता असून काही भागांत रस्ते खचले आहेत.
सात जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून तिथे लष्कराच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी तसेच पुलाचा वापर करत बचावकार्य करण्यासाठी लष्कर प्रयत्न करत आहे. दरम्यान पर्यटकांना धोक्याच्या भागात जाण्यापासून रोखण्यात येत आहे.
८ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत एकूण २९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २५ जणांचा भूस्खलनामुळे तर चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५३ हजार ५०१ लोकांची मदत छावण्यांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.