पुण्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना ‘या’ दिवशी असणार हेल्मेट बंधनकारक

पुणे : हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, महाविद्यालय आदी शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, भारतात दररोद सुमारे ४११ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेट परिधान केल्यास परिधान केल्यास दुचाकी अपघातात जीव वाचवण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते.

मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर १५ ते २१ मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात ‘७ यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक २०२३’ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रस्ते अपघातांबाबत स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे, नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे.