गांदरबल: जम्मू-काश्मीर पोलीस व जवानांनी आज सोमवारी संयुक्तरित्या राबवलेल्या विशेष मोहीमेला मोठे यश आले आहे. यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना काश्मीरमधील गांदरबल येथून अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांबरोबरच ‘एके – 47’ रायफलसह मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.
पाकिस्तानी सेना व आयएसआयच्या मदतीने लश्कर ए तैयबा (एलइटी), हिजबुल मुजाहिद्दीन(एचएम) आणि जैश ए मोहम्मद (जेएम) या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरसह भारताच्या अन्य काही भागात दहशतवादी कारवायांसाठी एकत्र येत जबाबदाऱ्या वाटून घेतल्या असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.
कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानसह दहशवादी संघटनेकडून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न होतो आहे. काश्मीर खोरे अशांत ठेवण्यासाठी त्यांच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान नव्या बनावट नोटांद्वारे भारताला आर्थिक नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील माहिती समोर आली होती. याचबरोबर पाकिस्तानी सैन्याकडूनही भारतात घातपात घडवण्यासाठी दहशतवादी संघटनांना पाठबळ दिले जात आहे.