उन्हाळयात भाज्यांच्या भाववाढीचे चटके

0

डोंबिवली (श्रुती नानल) : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यांवर झाला आहे. किरकोळ बाजारात हिरव्यागार भाजीपाल्यासह फळभाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या असून पाणीटंचाईसोबत महागाईचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहे. एरवी, डोळ्यात पाणी आणणारा कांदा १० ते १२ रुपये प्रति किलोने उपलब्ध असताना दुसरीकडे मेथीच्या जुडीसाठी ५० रुपये तर शेपू व पालकसाठी ३० रुपये मोजावे लागतात. इतर भाज्यांचे दरही ४० ते ८० रुपये प्रति किलोपर्यंत गेल्यामुळे भाजी खरेदी करताना गृहिणींनी हात आखडता घेतला आहे.

मार्चपासून उन्हाचे चटके सोसणाऱ्या ग्राहकाचे यंदा आर्थिक गणितही यामुळे कोलमडू लागल्याचे दिसते. उन्हाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या मालात घट झाली आहे. नाशिक, पुणे, जिल्ह्यातील आसपासचा भाग अशा ठिकाणांहून शेतीतील भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यंदा कमी झाली आहे. मालाची विक्री करण्यासाठी कृषी बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांकडील भाजीपाल्यात झालेली घट लक्षात घेता या भाज्यांचे भाव वधारले आहेत. मुख्य बाजारपेठेतच भाज्यांचे भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम शहरातील भाजीविक्रेत्यांवरही झाला आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे. जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे दर उंचावले आहे. शेतातून काढलेल्या कृषिमालाची गुणवत्तेनुसार तीन वेगवेगळ्या गटात वर्गवारी केली जाते. घाऊक बाजारात भाव चांगलेच उंचावले आहेत. सध्या किरकोळ बाजारात बटाटा वगळता एकही भाजी ४० रुपये किलोच्या आतमध्ये मिळत नाही. दोडके व गिलके ही एरवी सर्वात कमी भाव असणारी भाजी. मात्र सध्या त्यांच्यासह कारल्याचेही भाव प्रत्येकी ८० रुपये किलो आहे. टोमॅटो ६० रुपये, वांगी ६०, ढोबळी मिरची ६०, भोपळा ४०, भेंडी ६०, बटाटा २० ते २५ रुपये किलो असे भाव असल्याची माहिती विक्रेते तुकाराम दोंदे यांनी दिली. उन्हामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर ४० रुपये जुडी, मेथी ५० रुपये, शेपू २० ते २५ रुपये तर कांदा पात ३० रुपये जुडी आहे. किरकोळ बाजारातील या स्थितीमुळे ग्राहक हात आखडून खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यास ग्राहक कुठूनही खरेदी करतात; परंतु भाव वाढल्यावर ते कुठे स्वस्त मिळेल, याचा शोध घेऊन भाजी बाजारात येतात, अशी प्रतिक्रियाही काही जणांनी नोंदविली. गृहिणींनी अल्प प्रमाणात खरेदी वा कडधान्यासारखे पर्याय स्वीकारल्याचे पाहावयास मिळत आहे.

भाजीपाल्याचे पीक कमी घेतले गेले आहे. तसेच उन्हाळयाचा परिणाम यामुळे भाज्या सुकून जातात. आणि या सुकलेल्या भाज्या तशाच वाया जातात. माल कमी येत असल्याने परिणामी भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत.
शामकांत चौधरी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याण