नवी दिल्ली: भारताची युवा धावपटू ‘ढिंग एक्स्प्रेस’ नावाने ओळखली जाणारी हिमा दास हिने चेक रिपब्लिक या ठिकाणी सुरु असलेल्या महिलांच्या ४०० मिटर शर्यतीत सुर्वण पदक पटकावले आहे. हिमाने हे पदक मेटूजी ग्रँड प्रिक्स अॅथलेटिक्स स्पर्धेत ४०० मीटर अंतर ५२.०९ सेकंदात पार केले. हिमाचे हे या महिन्यातील पाचवे सुवर्ण पदक आहे. या विषयीची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती, दिली.
यापूर्वी हिमाने युरोप, कुंटो अॅथलेटिक्स मीटर मध्ये, १३ जुलैला चेक गणराज्यात, १७ जुलैला टाबोर ग्रँड प्रिक्समधील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक कमावले आहे. चेक रिपब्लिकमधील या स्पर्धेत भारताच्या व्ही. के. विस्मयाने दुसरे स्थान पटकावले. विस्मयाने ४०० मीटरचे अंतर ५२.४८ सेकंदात पार केले. तर तिसऱ्या स्थानी आलेल्या सरिताबेन गायकवाड हिने हेच अंतर ५३.२८ सेकंदात पार केले.
पुरुषांच्या २०० मीटरच्या स्पर्धेत मोहम्मद अनसने २०.९५ सेकंदात हे अंतर पार करत दुसरे स्थान पटकावले. पुरुषांच्या ४०० मीटरच्या स्पर्धेत भारताच्या नोह निर्मल टॉमने हे अंतर ४६.०५ सेकंदात पार करत रौप्य पदक मिळवले. तसेच पुरुषांच्या ४०० मीटरच्या अडथळा शर्यतीत भारताच्या एम. पी. जाबीर याने हे अंतर ४९. ६६ सेकंदाच पार करून सुवर्ण पटकावले. जितीन पॉलने हे अंतर ५१.४५ सेकंदात पार करत दुसरे स्थान पटकावले.