समलैंगिक संबंध ठेवणे अनैसर्गिकच-आरएसएस

0

नागपूर- दोन समलैंगिक सज्ञान व्यक्तींनी परस्परसंमतीने ठेवलेले संबंध हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली प्रतिक्रिया दिली असून कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हीही याला गुन्हा मानत नाही. मात्र, असे शारीरिक संबंध हे अनैसर्गिकच असल्याने हे प्रकरण सामाजिक आणि मनोवैज्ञानिक स्तरावर चर्चेद्वारे सोडवण्यात यावे असे संघाने म्हटले आहे.

परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दरम्यान, विविध पक्ष संघटनांनी कोर्टाच्या या निकालाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, संघाने कायमच समलैंगिकता अनैसर्गिक आणि अधार्मिक असल्याचे म्हटले आहे. मात्र, यावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर आता संघाची भुमिका काहीशी बदलली असून कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही याला गुन्हा मानत नाही. मात्र, काही स्वरुपाचे समलैंगिक शरीरसंबंध हे नैसर्गिक नाहीत तसेच सामजिकदृष्ट्या स्विकारार्ह नाहीत, त्यामुळे आमची अशा संबंधांना पाठींबा नाही, असे संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी म्हटले आहे.