अजित पवार नॉट रिचेबल’, या बातम्यांवर संताप व्यक्त करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, एखाद्याची बदनामी करायची तर किती करायची.
आम्ही लोकनेते असल्यामुळे प्रसार माध्यमे आमच्या बाबत विविध बातम्या देतात. तो त्यांचा अधिकारही आहे. मात्र, निराधार बातम्या देण्यापूर्वी काही खातरजमा तरी करायला पाहीजे की नाही?. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या छापल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी कारण नसताना माझी बदनामी करू नये.
अजित पवार नॉट रिचेबल’ अशा आशयाचा बातम्या काही माध्यमांतून कालपासून (८ एप्रिल) प्रसारित केल्या जात आहेत. अशातच पवार आज (९ एप्रिल) माध्यमांसमोर आले आणि त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना चांगलंच सुनावलं. अजित पवार यांनी पुण्यातील खराडी परिसरात एका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आज उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली, तसेच कालपासून सुरू असलेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली. ‘अजित पवार नॉट रिचेबल’ अशा आशयाचा बातम्यांंमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. तसेच, सोशल मीडियावरही अजित पवार चांगलेच चर्चेत होते. अनेकांना पहाटेच्या शपथविधीची पुन्हा आठवण झाली. मात्र, आज अजित पवारांनी या बातम्यांची हवा काढून टाकली.
अजित पवार म्हणाले की, काल काम करत असताना मला पित्ताचा त्रास होऊ लागला. जागरणं आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधं घेतली आणि झोपलो. आज बरं वाटू लागल्यानंतर सकाळपासून मी कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमं कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होतं.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे काल पुण्यात नियोजित तीन कार्यक्रम होते. पण काल अचानकपणे दुपारी दोन वाजता अजित पवार यांनी तिन्ही कार्यक्रम रद्द केले. कार्यक्रम रद्द करण्याचं कारण समजू शकलं नव्हतं, त्यानंतर आजचे आठ कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, आज सकाळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. तसेच ते नॉट रिचेबल असण्याच्या बातम्या खोट्या ठरवल्या. दरम्यान, पवार यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर नाराजी देखील व्यक्त केली.