लोक भावनेचा आदर नसणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष—जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर

काँग्रेस पक्षातर्फे धुळे जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन

शिंदखेडा (प्रतिनिधी)–केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षातर्फे जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ काल शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावाजवळ असलेल्या क्रांती स्मारक येथे करण्यात आला. पदयात्रेच्या प्रारंभी क्रांती स्मारकावर प्रदेश काँग्रेसचे सचिव युवराज करणकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या पदयात्रेत सर्वसामान्य जनतेच्या अडचणी काँग्रेसने नेत्यांनी जाणून घेतल्या. क्रांती स्मारकापासून निघालेल्या या जनसंवाद यात्रेचा समारोप सायंकाळी खलाणे येथे करण्यात आला. या संवाद यात्रेत प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी नेतृत्व केले.

सकाळी साडेसहा वाजता क्रांती स्मारकापासून सुरू झालेली पदयात्रा भडणे, हातनूर, साळवे, परसामळ, या गावातील जनतेशी संवाद साधत सकाळी नऊ वाजता शिंदखेडा शहरात या जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी प.सं. सभापती प्रा.सुरेश देसले, शिंदखेडा नगरपंचायतीचे विरोधी गटनेते सुनील चौधरी,माजी नगराध्यक्ष दीपक देसले,दिनेश माळी, दीपक अहिरे, नाना चौधरी, परीक्षीत देशमुख, समद शेख, शब्बीर पठाण, सुमित जैन, कैलास वाघ, अशोक बोरसे, नानाभाऊ माळी, गजेंद्र भामरे, प्रमोद सिसोदे, रावसाहेब पवार गायत्री जयस्वाल,छाया पवार,उपस्थित होते.

पदयात्रेचे शिंदखेडा शहरात भगवा चौकात शिंदखेडा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत केल्यानंतर पदयात्रा बस स्टॅन्ड मार्गे चौफुली वरून वरपाडा रोड, हैदर चौक , नगरपंचायत, रथ चौक, माळीवाडा, जाधव नगर मार्गे गांधी चौकात आली . गांधी चौकात विविध शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर पदयात्रेत सहभागी काँग्रेसच्या नेत्यांनी संवाद साधला.

शिंदखेडा येथून जनसंवाद यात्रा चिरणे कदाने , बाभुळदे, महाळपुर, निशाने मार्गे संध्याकाळी सात वाजता खलाणे गावात पोहोचतात भव्य स्वागत करण्यात आले.या पदयात्रेत सहभागी काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे झेंडे हातामध्ये घेतले होते.

लोक भावनेचा आदर नसणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे दिसून येत आहे. महागाई, बेरोजगारी, कामगार विरोधी धोरण, कर्जमाफी, लोड शेडिंग, पिक विमा याबाबतीत सरकारचे असलेले विरोधी धोरण कारणीभूत आहे. काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यामध्ये काढण्यात आलेल्या या जनसंवाद यात्रेला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची अग्रीम 25% रक्कम खात्यावर वर्ग करण्याबाबत उद्या मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती सनेर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रीम रक्कम जमा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचे येथे सात सप्टेंबर रोजी जनसंवाद यात्रा काढण्यात येणार असून या यात्रेला दोंडाईचा येथील दादासाहेब रावळ यांच्या स्मृतिस्थळा पासून सुरुवात होणार आहे. याच संवाद यात्रेत माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी काँग्रेसचे नेते संवाद साधणार आहेत.

 

**** जनसंवाद यात्रेला आठवडे बाजाराचा आधार–धुळे जिल्ह्यात काँग्रेस तर्फे 3 सप्टेंबर पासून काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील मोठमोठया शहरात या संवाद यात्रेचे आयोजन आठवडे बाजाराच्या दिवशी करण्यात आले आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी त्या शहराच्या जवळील इतर गावांचे नागरिक देखील येतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांशी सुसंवाद साधता येतो म्हणून या जनसंवाद यात्रेचे नियोजन आठवडे बाजाराच्या दिवशी करण्यात आल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. अधिकाधिक नागरिकांशी संवाद साधता यावा यासाठी आठवडे बाजाराच्या दिवशी या जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले असले तरी काँग्रेसने काढलेल्या या जनसंवाद यात्रेला आठवडे बाजाराचा आधार अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.***