बीड : लग्नात मुलीकडच्यांनी नवरदेवाकडील लोकांकडून नवरदेवाला घोड्यावर बसविण्यापूर्वी तसेच बूट लपवून पैसे घेण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे. पैसे घेणे हा उद्देश नसतो तर मजा म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात मात्र एका लग्नात बूट लपवण्यावरुन झालेल्या वादात चक्क नवरदेवाचे डोक फुटल्याची घटना आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला. महत्त्वाचं म्हणजे सासऱ्याने झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला.
सुलताना युनूस शेखचा नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी रविवारी लग्न होता. पण लग्नाआधी मुलीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्याने वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झाले. मग नवरदेवाने मुंडावळ्या आणि सेहरा काढून फेकून दिला. या हाणामारी नवरदेवाचं डोकं फुटलं आणि त्याला सहा टाके पडले. सासऱ्यानेच आपल्या हातातील लाकडाने नवरदेवावर वार केल्याचा आरोप आहे.
सुलतानवर केजच्या सरकारी रुग्णालयात उपचार केल्यावर, नवरदेवाची मंडळी युसूफ वडगाव पोलिस स्टेशनला गेली. मात्र ही मंडळी पोलिस स्टेशनला गेल्याचं कळताच वधूकडच्या मंडळीनी वऱ्हाडींचा टेम्पो अडवून ठेवला. बराच काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस दाखल झाले. मात्र शेवटी हा वाद तलाक होऊन संपला.