यावल- वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा उद्देशाने यावल अभायरण्यात घुसलेल्या पाच शिकार्यांना वन विभागाच्या अधिकार्यांनी वन्यप्रेमीच्या मदतीने सापळा रचून पकडले आहे. त्यांचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. वनविभागाकडून रात्रीच्यावेळी प्राणीगणना करत असताना ही प्रकार समोर आला.
यावल अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाकडून प्राणी गणने करीता तब्बल 23 ठिकाणी मचाणी लावण्यात आल्या होत्या व अनेक वनप्रेमींनी देखील या प्राणी गणनेकरीता वनात हजेरी लावली होती तर वनविभागाकडून या करीता विविध अधिकारी कर्मचारीदेखील वनात तळ ठोकुन होते. वनात असलेल्या यावल प्रादेशिक वनविभाग पूर्वचे वनक्षेत्रपाल व्ही.एम.पाटील यांना वनातील कक्ष क्रमांक 45 मध्ये क्षेत्र तिड्या-मोहमांडली यात काही जण वनप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने मोर नदी व वाघूर भागात असल्याची माहिती मिळाली.
पाटील यांनी सोबत वनपाल ए.आर.धात्रक, जी.बी.डोंगरे, डी.डी.जाधव, डी.एस.सांगवीकर, एस.आर.तडवी, गस्ती पथकाचे एस.आर.पाटील यांना सोबत घेत सापळा लावून नदीपात्रात धडक दिली तेव्हा वनअधिकारी व कर्मचार्यांना पाहुन शिकारी करीता आलेल्यांनी पळ काढला त्यात चार जण पसार झाले मात्र गेंदराम हादू बारेला (रा.तिड्या, ता.रावेर), गिलदार वेस्त्या बारेला व अनिल जामसिंग बारेला (दोघं रा. अंधारमळी, ता.रावेर) यांना अटक करण्यात आली. तिघांना रावेर न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली. पसार चौघांपैकी बुधवारी वनविभागानेे गेलसिंग कान्या बारेला व दिनेश नरसिंग बारेला या दोघांना अंधारमळी, ता.रावेर येथून अटक करण्यात आली आहे. संशयीतांकडून शिकारीचे काही साहित्यदेखील वनविभागाने ताब्यात घेतले आहे.