जळगाव- तुझ्या इच्छेप्रमाणे मी आणि माझे आई, वडील आम्ही हे जग सोडून निघून जात आहोत, तुझी इच्छा पूर्ण होवो, ही सदीच्छा अशी पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून पती, आई वडीलांसह घरातून कुठेतरी निघून गेल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला आहे. दरम्यान पत्नी लग्नाला गेलेली होती, तिघांचे फोन बंद येत असल्याने, घराचे कुलूप उघडल्यावर घरातील डायरीमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीवरुन प्रकार समोर आला. दीपक आत्माराम सोनगीरे (वय 36) त्यांचे वडील आत्माराम रामचंद्र सोनगीरे (वय 60) व आई रजनी (वय 55, सर्व रा.श्रीधरनगर) असे बेपत्ता झालेल्या तीघांची नावे आहेत. दीपक यांच्या पत्नी रुपाली (वय 28) यांनी पोलिसात खबर दिली असून चिठ्ठीही पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. नेमके तिघे घरुन एकाचवेळी कुठे गेले हे व त्याचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, श्रीधर नगर प्लॉट नं 23, पॉवर हाऊसजवळ दिपक आत्माराम सोनगिरे हा तरुण वडील आत्माराम सोनगिरे, आई रजनी, पत्नी रुपाली व मुलगा महेश यांच्यासह वास्तव्यास आहेत. एमआयडीसीतील एच.डी. फायर कंपनीत काम करुन दिपक सोनगिरे हा कुटुंबांसह वास्तव्यास आहे. 11 रोजी आत्माराम व रजनी हे दाम्पत्य यावल तालुक्यातील चिंचोली येथे भाच्याचा लग्नाला तर रुपाली हिचे पिंप्राळा येथील मावशीच्या मुलीचे 14 मे रोजी लग्न होते. या कार्यक्रमासाठी दिपाली तिच्या मामाच्या मुलीसोबत 12 रोजी पिंप्राळा येथे गेली. यावेळी एक चाबी सासूकडे असते म्हणून दुसरी रुपाली हिने चाबी शेजारी राहणार्या देशपांडे यांच्याकड दिली. दिपक नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेला होता.
13 मे पासून पतीसह, सासू, सासरे बेपत्ता
13 रोजी रुपाली ही पतीसोबत लग्नाकरीता कपडे घेण्यासाठी सासरी श्रीधर नगर येथे आली. यावेळी सासू घरी तर सासरे बाहेर गेलेले होते. दिपकने रुपालीला तु हळदीला जा, मी परस्पर लग्नाला येईल असे सांगितले. त्यानुसार रुपाली इतर नातेवाईंकासंह धरणावला निघून गेली. तेथून तिने पतीला येण्याबाबत फोन लावला असता फोन बंद असल्याने संपर्क होवू शकला नाही. लग्न आटोपून 14 मे रोजी नातेवाईकांसह घरी आली, त्यावेळी घर बंद होते, पतीसह सासू, सासर्यांचे फोन बंद होते.
आम्ही मेलो तुला सोडून, तपास करु नकोस.
प्रिय रुपाली, तुझ्या इच्छेने मी आणि माझे आई वडील हे जग सोडून जात आहोत, तुझी इच्छा पूर्ण होवो, ही सदिच्छा, तुझा आणि फक्त तुझाच दिपक, आमचा तपास करु नकोस, आम्ही मेला तुला सोडून असा मजकुर लिहिलेला आढळून आला. तिघे कुठेतरी निघून गेल्याची खात्री झाल्यावर रुपाली हिने बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यावरुन नोंद करण्यात आली असून तपास विजय निकुंभ करीत आहेत.