‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत..’; राधाकृष्ण विखे-पाटील यांचं विधान चर्चेत

पुणे : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून जोरदार चर्चा सूरू आहे. नगरमध्ये काही दिवसांपुर्वी त्याचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स देखील लागले होते. त्यामुळे विखे-पाटील हे मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, यावर स्वत: राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असल्याच्या अफवा उठविण्यात येत आहेत. आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत लढविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी नैतिकता स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, यावरून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. युती म्हणून मतदारांचा कौल मिळाल्यानंतरही भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि सत्तेसाठी लाचार होणाऱ्या उद्धव ठाकरे यांना नैतिकतेची भाषा शोभत नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.