मुंबई:‘माझ्याकडून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, तसेच मी मुंबई इंडियन्स आयपीएल संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही’, असे स्पष्टीकरण देत सचिन तेंडुलकर याने आपल्यावरी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी पाठवलेल्या नोटीशीला सचिन तेंडूलकर यांनी उत्तर दिले आहे. उत्तरात १४ मुद्द्यांचा अंतर्भाव आहे. आपण मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाचे मार्गदर्शक असून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या नियमावलीत उल्लेख केलेल्या कोणत्याही पदावर काम करत नाही, असेही तेंडुलकर याने लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.
माझ्या अनुभवाच्या आधारे मुंबई इंडियन्स संघाला योग्य ते मार्गदर्शन करणे हे माझे काम आहे. हा मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचा भाग आहे. बीसीसीआयच्या नियम ३८ (४) (जे) यात उल्लेख केल्याप्रमाणे ‘गव्हर्नन्स’, ‘मॅनेजमेट’ आणि ‘एम्ल्पॉयमेंट’शी संबंधित कोणतेही पद मी भूषवित नाही, असे स्पष्टीकरण तेंडुलकर याने दिले आहे.
तेंडुलकर आणि प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी हितसंबंधांच्या मुद्द्यावरून नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर बीसीसीआयचे अनेक अधिकारी नाराज झाले होते. सचिन आणि लक्ष्मण यांना नोटीस पाठवायला नको होती, असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.
सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक असून लक्ष्मणही सनरायझर्स हैदराबाद संघात याच पदावर नियुक्त आहे. सौरव गांगुलीलाही अशीच नोटीस बजावण्यात आली होती. तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष, क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आणि दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल संघाचा सल्लागार आहे, त्यामुळे त्याला चौकशीला बोलावण्यात आले होते. सचिन आणि व्हीव्हीएस हेदेखील बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य आहेत, म्हणून त्यांना बोलावण्यात आले आहे.