केदारनाथच्या भूमीशी माझे विशेष नाते : नरेंद्र मोदी

0

रुद्रप्रयाग: लोकसभेचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ, बद्रीनाथच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून, काल ते केदारनाथची पूजा करून ध्यानधारणा करण्यासाठी एका गुहेत बसले होते . आज ध्यानधारणा करून बाहेर आल्यानंतर मोदी यांनी प्रसार माध्यमांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. केदारनाथ सोबत माझे विशेष असे नाते असल्याचे मोदींनी सांगितले. त्यानंतर आज मोदी बद्रीनाथच्या दर्शनाला जाणार आहे.

पुढे मोदी म्हणाले की, केदारनाथमध्ये ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या वेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्याच वेळी माझी केदारनाथसाठी काहीतरी करायची इच्छा होती. सुदैवाने मी पंतप्रधान झाल्यानंतर मला ही संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनवला असून त्यावर काम सुरु आहे. मी जेव्हा पण देवाच्या चरणी नतमस्तक होतो त्यावेळी मी देवाकडे काहीच मागत नाही असे मोदींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान झाल्यापासून केदारनाथला येण्याचा नेहमी योग मिळत आहे. आज खूप दिवसांनी मला एकांत मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा हा केदारनाथचा चौथा दौरा आहे. मोदींनी मंत्रोच्चारात महादेवाची पूजा केली. यावेळी त्यांनी खास गढवाली ड्रेस परिधान केला होता. पूजा झाल्यानंतर त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालत, तिथे होत असलेल्या कामाचा आढावा घेतला.