जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार : अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार 40 आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये सामील होणार, अशा बातम्या दिल्या जात होत्या. त्याविषयी विधानभवनात स्वतः माध्यमांपुढे येऊन अजित पवार यांनी खुलासा केला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझे कोणाशीही मतभेद नाहीत. 1999 मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही परिवार म्हणून एकत्र काम करीत आहोत. मात्र, तरीही माझ्याबद्दल अशा चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. माझ्याबद्दल इतके प्रेम उफाळून येण्याचे काय कारण आहे, हेच मला समजत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत मी राष्ट्रवादीचेच काम करीत राहणार असल्याचा खुलासा त्यांनी केला. राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.

आमच्या पक्षाची भूमिका दुसऱ्याच पक्षाचे प्रवक्ते मांडतात. त्यांनी त्यांच्या मुखपत्रात आपल्या पक्षाची भूमिका मांडावी, राष्ट्रवादी पक्ष आणि माझ्याविषयी प्रतिक्रिया देण्याचा अधिकार कोणी दिला? अशा शब्दांत अजित पवार यांनी संजय राऊत यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. माझ्याबद्दलच्या चुकीच्या बातम्या पसरविणे आता थांबवा, शरद पवार साहेबांनी देखील आज या बातम्या निरर्थक असल्याचे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधून अजित पवार यांनी याविषयीचा एकदाच तुकडा पाडा, असे माध्यमांना बजावून सांगितले.

 

आमदारांची कुठलीही बैठक बोलावली नाही !

विधानभवनात राष्ट्रवादीच्या काही आमदारांची मी बैठक बोलावली असल्याच्या बातम्या सातत्याने दाखविल्या जात होत्या. माझ्या पक्षातील काही आमदार त्यांच्या कामानिमित्त विधानभवनात आले. कुठलीही बैठक बोलाविण्यात आली नव्हती. ४० आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. नुसत्याच अफवा पसरविल्या जात होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणी नेत्याने तुम्हाला अशी माहिती दिली का? असा उलट सवाल अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिला.