मुंबई : आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ) आज मंगळवारी २०१८ या वर्षाचा वन-डे व कसोटी संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. त्यामुळे विराट कोहलीने पुन्हा एकदा शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला. आयसीसीने जाहीर केलेल्या या संघात इंग्लड व भारताचे प्रत्येकी चार खेळाडू आहेत.
आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत इंग्लंड व भारत हे संघ अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे २०१८च्या संघात त्यांचे वर्चस्व असणे साहजिकच होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ मध्ये १४पैकी ९ सामने जिंकले आहेत. इंग्लंडसाठीही २०१८ हे वर्ष विशेष राहिले. त्यांनी २४ पैकी १७ सामन्यांत विजय मिळवले आहेत. या संघात न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंनीही स्थान पटकावले आहे.