न्युयोर्क-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य माघारीची घोषणा करतानाच अफगाणिस्तानातील सैन्यही निम्म्याने कमी करण्याचे ठरवले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आयसिसशी लढण्यासाठीच्या जागतिक आघाडीतील अमेरिकेचे दूत ब्रेट मॅकगर्क यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. याअगोदर ट्रम्प यांच्या धोरणाशी न पटल्याने संरक्षणमंत्री जॉन मॅटिस यांनी राजीनामा दिला होता.
आयसिसचा पराभव झाला आहे असे मानणे हा मूर्खपणा आहे व अमेरिकी सैन्य माघारी घेणे ही मोठी चूक ठरेल, असा इशारा मॅकगर्क यांनी अकरा दिवसांपूर्वी दिला होता. मॅकगर्क यांनी फेब्रुवारीच्या मध्यावधीत पद सोडण्याचे ठरवलेले असताना ट्रम्प यांच्या घोषणेमुळे त्यांनी आधीच राजीनामा दिला आहे. मॅकगर्क यांची नियुक्ती ओबामा यांनी २०१५ मध्ये केली होती व त्यांना ट्रम्प यांनी पदावर कायम ठेवले होते.
मॅकगर्क यांनी राजीनामा पत्रात दहशतवादी बचावात्मक पवित्र्यात असले तरी त्यांचा पराभव झालेला नाही. त्यामुळे सीरियातून सैन्य माघारी घेण्यास अमेरिकेने खूप घाई केली आहे असे सांगतिले आहे. आयसिसला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.