थिरुअनंतपूरम-केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेक नागरिक बेघर झाले आहे. परिस्थिती बिकट बनली आहे अशा परिस्थितीत जर लष्कराने व हवाईदलाने मदत केली नाही तर तब्बल ५० हजार जणांचा बळी जाऊ शकतो त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करा असे आवाहन अलापुझामधल्या चेंगनूरचे सजी चेरीयन या आमदाराने केले आहे.
जवळपास १० हजार जण पुरामध्ये अडकले असून ते अक्षरश: मृत्यूशय्येवर आहेत. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. आणि जर लष्कराने तातडीने संपूर्ण शक्तिनिशी सहाय्य केले नाही तर फक्त चेंगनूरमध्येच बळींची संख्या ५० हजार इतकी होऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे.
चेरियन यांनी माझ्या मतदारसंघात स्थिती जास्तीच गंभीर असून एकही क्षण न घालवता मदत हवी असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर चेरीयन यांच्या आवाहनानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून तिथली परिस्थिती किती गंभीर असेल याची कल्पना येत आहे.