फेसबूकवर १५ हजार लाइक्स मिळविणाऱ्यांनाच विधानसभेची उमेदवारी; काँग्रेसचे अजब फर्मान

0

भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत करण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. त्यासाठीच निवडणुकीतील उमेदवारीसाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे कार्यकर्त्यांसाठी अनिवार्य करण्यात आले असून, ज्या कार्यकर्त्याचे फेसबूकवर 15 हजार लाइक्स आणि पाच हजार ट्विटरवर फॉलोअर्स असतील अशाच कार्यकर्त्याला विधानसभेचे तिकीट देण्यात येईल, असे फर्मान मध्य प्रदेश काँग्रेसने काढले आहे.

मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले हे. या पत्रामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक अटीशर्थींचा उल्लेख करण्यात आला आहे. इच्छुक उमेदरवारांच्या फेसबूक पेजला किमान 15 हजार लाइक्स आणि ट्विटरवर पाच हजार फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. तसेच बूथ लेव्हल कार्यकर्त्यांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप असणे अनिवार्य आहे, अशा अटींचा उल्लेख या पत्रात आहे.

इतकेच नाही तर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेल्या प्रत्येक पोस्टला रिट्विट करणेही आवश्यक असेल. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपबाबचा तपशील 15 सप्टेंबरपर्यंत मध्य प्रदेश काँग्रेस समिती आणि आयटी विभागाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपाची सत्ता असून, या वर्षअखेरीस राज्यात निवडणूक होणार आहे.