मोदींची लोकप्रियता घटली तर राहुल गांधींची वाढली

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे २०१८ ला आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आहे. २०१९ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेससमोर मुख्य आव्हान मोदींचेच असणार आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर सध्या देशात नवे राजकीय समीकरण जुळत असल्याचे समोर आले आहे. एका सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींची लोकप्रियता मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत जागा कमी होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी होत असली तरी, आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपा पुन्हा एकदा केंद्रात सरकार स्थापन करेल. मात्र यासाठी त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल. रिपोर्टनुसार, एनडीएला २७४, युपीएला १६४ आणि इतर पक्षांना १०५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार, एनडीएच्या ४९ जागा कमी होत आहेत. तर युपीएला १०४ जागांचा फायदा होत आहे. इतर पक्षांना ४८ जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

एनडीएला ३७ टक्के मतं मिळत आहेत. २०१४ मध्ये त्यांना ३६ टक्के मतं मिळाली होती. युपीएला ३१ टक्के मतं मिळत असून, २०१४ मध्ये त्यांना फक्त २५ टक्के मतंच मिळाली होती. इतर पक्षांना ३२ टक्के मतं मिळत असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत ३९ टक्के मतं मिळाली होती. सर्व्हेमुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे. जानेवारीत राहुल गांधींच्या लोकप्रियता २० टक्के होती, जी मे महिन्यात वाढून २४ टक्के झाली आहे. २०१४ मध्ये राहुल गांधींची लोकप्रियता १६ टक्के होती. २०१७ मध्ये लोकप्रियता कमी होऊन ९ टक्के झाली होती. जानेवारीत मोदींची लोकप्रियता ३७ टक्के होती, जी सध्या ३४ टक्क्यांवर पोहोचली आहे. मे २०१४ मध्ये जेव्हा मोदींनी निवडणूक जिंकली होती तेव्हा त्यांची लोकप्रियता ३६ टक्के होती.