मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कर्टोने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरून नव्हते, असं न्यायालयाने निकालात नोंदवलं आहे. दरम्यान, आता तत्कालीन राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण टिप्पणी करू शकत नाही. बहुमत चाचणीचा निर्णय तेव्हा चुकीचा होता. आता त्याच्याशी काय करायचं? यासंदर्भात न्यायालयानं सगळं सांगितलं आहे. न्यायालयाच्या निकालापुढे मला काहीही बोलायचं नाही. आता आपण राज्यपाल पदावर नसून राजकीय मुद्यांपासून लांबच राहातो.
तीन महिन्यांपूर्वीच राज्यपाल पदावरून मी दूर झालो आहे. मी राजकीय मुद्यांपासून स्वत:ला वेगळं ठेवलं आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होतं. त्यावर न्यायालयानं निकाल दिला आहे. या निकालावर जे कायद्याचे जाणकार आहेत, तेच प्रतिक्रिया देतील. मी कायद्याचा विद्यार्थी नाहीये. मला संसदीय कामकाज माहिती आहे. त्यावेळई मी जे पाऊल उचललं, ते विचारपूर्वक उचललं. एखाद्याचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी काय त्याला असं सांगणार का की राजीनामा नका देऊ? सर्वोच्च न्यायालयाने जर काही म्हटलं असेल, तर त्यांचं विश्लेषण करणं विश्लेषकांचं काम आहे, माझं काम नाही, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.