नवीदिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत एक्झिट पोल मधून मिळत आहे. त्यावर सगळ्या विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. काही पक्षाचे नेते हा एक्झिट पोल आम्हाला मान्य नसल्याचे सांगत आहे तर काही याला भाजपाचा डाव असल्याचे सांगितले जात आहे. आता यामध्ये आम आदमी पक्षाने सहभाग घेतला असून पुन्हा एकदा ईव्हीएमला लक्ष्य केलं. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील पडताळणी चुकल्यास निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी केली.
दिल्लीमध्ये ‘आप’चे सरकार असून त्या ठिकाणी ‘आप’ ला एकही जागा मिळणार नसल्याचे एक्झिट पोल मधून समोर आले आहे. दिल्लीच्या ७ जागांवर भाजपा विजयी होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या एक्झिट पोल नंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले . ‘खरा खेळ ईव्हीएमच्या माध्यमातून खेळला जाणार का? पैसे घेऊन एक्झिट पोल केले जातात का? बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल. या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपा विजयी होणार, हे कसं शक्य आहे?’ असे प्रश्न सिंह यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.
आप ला या निवडणुकीत भोपळा सुद्धा फोडता येणार नाही असे समोर आले आहे. तर काही एक्झिट पोल मधून आप ला दिल्लीत एक जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.