मुंबई-मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने सनराईजर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमधले आपले तिसरे विजेतेपद पटकावले आहे. या विजयानंतर सोशल मीडियावरही चेन्नईच्या समर्थकांनी आनंद साजरा केला. दरम्यान कालच्या सामन्यात चेन्नईचा फिरकीपटू कर्ण शर्माबाबत अधिक चर्चा रंगताना दिसली.
अशी आहे कामगिरी
कर्ण शर्माने कालच्या सामन्यात आपल्या आयपीएल विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली आहे, असे म्हणतात कर्ण शर्मा ज्या टीमसोबत खेळतो ती टीम जिंकते. जर आयपीएल जिंकायची असेल तर कर्ण शर्माला घ्या असे मेसेज सोशल मीडियात फिरत आहे. झाले देखील तसे आहे. २०१६ साली कर्ण शर्मा हैदराबादच्या टीममध्ये होता तेंव्हा हैद्राबाद जिंकले होते, २०१७ साली मुंबईत होता तेंव्हा मुंबई विजेती ठरली आणि २०१८ साली चेन्नईत होता तेंव्हा चैनई जिंकली.
धोनीच्या विश्वासाला सार्थ ठरविले
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अंतिम सामन्यात हरभजन सिंहसारख्या महत्वाच्या गोलंदाजाला बसवून कर्ण शर्माला संघात जागा दिली. कर्ण शर्मानेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत कर्णधार केन विल्यमसनचा महत्वाचा बळी घेतला. दोन वर्षांनी पुनरागमन करुन आयपीएलचं विजेतेपद जिंकल्यामुळे सध्या चेन्नईच्या संघाचे चाहते भलतेच खुश आहेत. त्यामुळे अकराव्या हंगामात आता कर्ण शर्मा चेन्नईच्या संघाता हिस्सा राहतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.