फैजपुरात जमाते इस्लामी हिंद आणि धनाजी नाना महाविद्यालयातर्फे इफ्तार पार्टी

फैजपूर प्रतिनिधी । येथे जमाते इस्लामी हिंद, फैजपूर व तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरिषदादा मधुकरराव चौधरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधीक्षक, सिद्धेश्वर आखेगावकर पोलीस निरीक्षक फैजपूर, प्राचार्य डॉ. आर. वाय. चौधरी, प्राचार्य डॉ. आर. एल. चौधरी, आ. धनंजय चौधरी, प्रभाकर सोनवणे, प्रा. नंदकुमार आसाराम भंगाळे, सहसचिव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुफ्ती शोएब यांनी कुरआनची विलायत अरबी भाषेत उपस्थितानसमोर सादर केली व यांचे मराठी भाषांतर कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी उपस्थितांसमोर सादर केले. याप्रसंगी अध्यक्षीय समारोपात आमदार शिरीष चौधरी यांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याकडून दिव्य पवित्र कुराणाच्या माध्यमातून सर्वोत्तम मानवी जीवनाची संहिता लिहिली गेली असून प्रत्येकाने कुराण वाचन करावे व मानवतेचा हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवावा. यासोबत समाजात शांतता व बंधुता नांदण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन जागोजागी झाले पाहिजे. जमाती इस्लामी हिंद, फैजपूर शाखेमार्फत आयोजित रोजा इफ्तार पार्टीचे अप्रतिम आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन व कौतुक केले.

»» याप्रसंगी नाशिक येथून कुराणसहित बायबल या पवित्र ग्रंथावर संशोधन करून देश, विदेशात धर्मग्रंथांचा खरा अर्थ साध्या, सोप्या शब्दात मांडणाऱ्या प्रोफेसर वाजिद अली खान यांनी कुरआनची निर्मिती, रचना आणि संदेश यावर सविस्तर विवेचन केले. याप्रसंगी जमाती इस्लामी हिंद, फैजपूर शाखेचे माजी युथ विंग अध्यक्ष इरफान शेख, शहर अध्यक्ष अबू बकर जनाब, संदेश विभाग सचिव अब्दुल कादिर जनाब, कार्यक्रमाचे संयोजक शेख अहमद साहब, युथ विंग जमाते इस्लामी हिंद अध्यक्ष शेख आमीन, अन्सार अहमद, मुज्जमील अली, शेख नईम, शेख जाविद, शेख कौसर, श्रीराम सैंदाणे, शेखर महाजन, नितीन सपकाळे, कन्हैया आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार शेख अहमद यांनी मानले. यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी सोबत रोजा सोडला व प्रेम आणि बंधुतेचा आदर्श संदेश समाजासमोर मांडला. अशा प्रकारचे कार्यक्रम जागोजागी झाले पाहिजेत अशा प्रकारचा सूर उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.