मुंबई – पायाभूत सुविधांसाठी मुंबई आयआयटीला 1 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच भारतातील आयआयटीच्या मुलांचे जगभरात नाव असून त्यामध्ये मुंबईच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्रभाव अधिक आहे. त्यामुळेच स्टार्टअप क्षेत्रात भारत जगात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून आयआयटी मुंबईच्या 56 व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते या दीक्षान्त समारंभानंतर येथील पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. पंतप्रधानांसह दीक्षान्त सोहळ्याला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आयआयटीच्या वतीने सिम्फनी टेक्नोलॉजी ग्रुपचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रोमेश टी.वाधवानी यांना डी लिट प्रदान करण्यात आली.