न्हावी ता यावल
जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोर नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. कारखाना भागातील मोर नदी पात्रातून राजरोस वाळू उपसा केला जात आहे. नदी पात्रातील मातीमिश्रीत वाळूचा उपसा झाल्याने पात्रात प्रचंड खड्डे पडले आहेत. महसुल प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करुनही कोणतीच कारवाई केली जात नाही. उलट महसूली प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे.
फैजपूर येथून जवळच असलेल्या मसाका कारखाना जवळील मोर नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे. या बाबत प्रशासन मात्र मूग गिळून गप्प असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. एकीकडे जिल्हाधिकारी अवैध वाळू उपस्याबाबत रणशिंग फुंकतात आणि दुसरीकडे मात्र त्यांच्याच अखत्यारीत असलेले तहसील प्रशासन मात्र राजरोसपणे अवैध वाळू उपस्याला मूक संमती देत असल्याचे चित्र स्पष्पटपणे दिसत आहे. कारखाना लगतच्या नदी पात्रातून ट्रॅक्टर साह्याने बेसुमार वाळू उपसा होत आहे. या बाबत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारपर्यंत अर्थपूर्ण तडजोड होत आहे.
परिणामी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना चांगलेच फावत असून मोर नदी पात्रात रात्रीच्यावेळी अशा प्रकारची अवैध वाळू उपसा होत असल्याचे नागरिकांकडून उघड बोलले जात आहे. अवैध वाळू उपस्यावर तहसील प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे अवैध उपसा करणारे मात्र आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत.
यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासकीय-निमशासकीय खाजगी बांधकामे सुरु आहेत. त्यासाठी मोर नदी पात्रातून वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या संपूर्ण प्रकाराकडे महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे. आधीच नदीपात्र पावसाअभावी कोरडे पडले आहे. गेल्या काही दिवसापासून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुचा बेसुमार उपसा सुरुच आहे. अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे. या संपूर्ण प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
शासनाचे अध्यादेश कागदावरच
शासनाने गौण खनिज उत्खनना संदर्भात तीन सप्टेंबर 2019 रोजी अध्यादेश काढला आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. मात्र या समितीचे काम कागदावरच दिसते.
वाळू तस्करीत गुन्हेगार, राजकारणी : ग्राहकांची लूट
बेकायदा वाळू उपसातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. त्यामुळे या व्यवसायात अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. अनेक सराईत गुन्हेगारसुद्धा या क्षेत्रात उतरले आहेत. त्यातून वरचेवर गुन्हे घडत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडते आहे. ‘वाळू उपसा बंदी आहे, वाळू मिळत नाही’, असे सांगून ते ग्राहकांची लूट करीत आहेत