महसूल विभागाची धडक कारवाई
जळगाव : बांभोरी पुलाजवळ नेहमी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने भरतांना सहज नजरेत पडतात, परंतु महसूल विभागाला हे कधी दिसले नाही. अखेर आज सकाळी धरणगाव तहसीलदार मिलींद कुलथे यांच्या पथकाने ११ ट्रॅक्टर्स पकडले. यातील दोन ट्रॅक्टर्स वाळुमाफियांनी पळवून लावले. या कारवाईने वाळुमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही वाळू चोरी इतके दिवस महसूलच्या नजरेस का पडत नव्हती? या मागचे गौडबंगाल काय? अशी चर्चा आहे.
बांभोरी येथील पूल वाळुमाफियांनी पोखरुन काढला असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. तसेच टाकरखेडा व वैजनाथ जवळील नदी पात्रातूनदेखील वाळू चोरी होत असल्याची तक्रार आ. डॉ.सतीश पाटील यांनी केली होती. सावखेडा येथील वाळू गटाचा लिलाव झाला असून येथील वाहने आजूबाजूच्या परिसरातून अवैध वाळू उपसा करीत आहेत हे आजच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. या कारवाईसाठी पोलीस फोर्स देण्यात आला होता. आव्हाणी, धानोरा, फुफनगरी, निमखेडी या परिसरातूनदेखील ठेक्याच्या नावावर पावत्यांचा आधार घेऊन वाळू उचल केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पळवून नेलेल्या दोन ट्रॅक्टर्स मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त केलेली ९ वाहने धरणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
जळगाव तहसीलदारांचीही धडक कारवाई
जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांनी रात्री एक ट्रॅक्टर पकडले असून पथकाने एक डंपर जप्त केले आहे. मोठया प्रमाणात अवैध वाळू उपसा करणार्यांविरुध्द कारवाई सुरु असून सावखेडा येथील एकच ठेका सुरु असल्याने वाळू माफियांनी धुडघुस घातला आहे.