धुळ्यात ग.स. बँक कर्मचार्याने बँकेतच घेतला गळफास
धुळे | प्रतिनिधी
ग.स. बँकेत शिपाई असलेल्या कर्मचार्याने बँकेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरात बुधवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून योगेश निकम अस या कर्मचार्याचं नाव आहे. योगेश निकम यांच्यावर ग. स. बँकेचे सुमारे 10 लाख रुपयांचे कर्ज असल्याने त्या कर्जाच्या वारंवार नोटिसा येत होता. या कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
धुळे शहरातील झाशी राणी चौक परिसरातील शासकीय कर्मचार्यांची बँक (ग. स. बँक) याठिकाणी योगेश सुकलाल निकम (वय 45) हे शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांनी आज बँकेतच ड्युटीवर असताना 6 वाजेच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ग. स. बँकेचे व्यवस्थापक संजय देसले हे सायंकाळी बँकेत गेले असता त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी लागलीच आपल्या कर्मचार्यांना बोलावून या घटनेची माहिती दिली. याबाबत धुळे शहर पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी योगेश निकम यांनी लोखंडी ग्रीलला प्लास्टिक नळीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं दिसून आलं. याबाबतची माहिती मृत योगेश निकम यांच्या परीवरापर्यंत पोहचल्यानंनंतर त्यांनी देखील बँकेत धाव घेत एकच आक्रोश केला. धुळे शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर मृतदेह खाली उतरवत शवविच्छेदनसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे. ज्या बँकेत योगेश निकम शिपाई म्हणून कार्यरत होते त्याच बँकेचे यांच्यावर सुमारे 10 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ग. स. बँकेची वारंवार येणारी नोटीस आणि आपल्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.