VIDEO…चक्क गुजरातच्या विधानसभेत घुसला बिबट्या !

0

गांधीनगर- एखाद्या गावात, शहरात बिबट्या घुसल्याचे आपण आजपर्यंत ऐकले होते. मात्र गुजरातमध्ये चक्क विधानसभा सचिवालयात बिबट्या घुसल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा एक बिबट्या विधानसभा सचिवालयात घुसला आहे. वन विभाग आणि पोलिसांचे संयुक्त पथक बिबट्या पकडण्यासाठी अभियान राबवत आहे. सध्या सचिवालय बंद आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १ वाजून ५३ मिनिटांनी बिबट्या सचिवालयात घुसल्याचे दिसते. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अत्यंत संवेदनशील आहे. बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.

सचिवालयात मुख्यमंत्र्यांशिवाय सर्व मंत्र्यांचे कार्यालय आहे. ज्या इमारतीत बिबट्या घुसला आहे. ती इमारत सचिवालयाची मुख्य इमारत आहे. पोलिसांनी विधानसभेतील सर्व मार्ग बंद केला आहे. सात क्रमांकाच्या प्रवेशद्वारात बिबट्या घुसण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या बाहेर कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी उसळली आहे. हे संयुक्त ऑपरेशन संपेपर्यंत आत जाण्याची परवानगी नाही.

सर्वांच्या सुरक्षिततेला महत्व दिले जात असल्याचे पोलीस अधीक्षक मयूर चावला यांनी सांगितले. जोपर्यंत बिबट्या पकडला गेला आहे किंवा तेथून निघून गेला असल्याचे निश्चित होत नाही. तोपर्यंत कोणालाच आत जाऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.