नवी दिल्ली – भारतामध्ये कोट्यधीशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. एका वर्षात कोट्यधीशांच्या संख्येत तब्बल ७३०० नवीन कोट्यधीशांची भर पडली आहे. क्रेडिट स्विसने दिलेल्या अहवालानुसार, ७३०० लोकांमुळे भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या आता ३.४३ लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांकडे ६ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ४४१ लाख कोटींची एकूण संपत्ती आहे. कोट्यधीशांमध्ये महिलांची संख्या ही अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतातील नव्या कोट्यधीशांपैकी ३४०० जणांकडे ५-५ कोटी डॉलर्स म्हणजेच ३६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. तर १५०० जणांकडे १०-१० कोटी डॉलर्स म्हणजेच जवळपास ७३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. डॉलर्सच्या तुलनेत देशाच्या एकूण संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे ६००० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. २०२३ पर्यंत भारतात कोट्याधीशांच्या संखेत मोठी वाढ होणार आहे. ५,२६००० लोक कोट्याधीश होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे ८८०० अब्ज डॉलर्सची संपत्ती असणार आहे.