मुंबई:इशरत जहाँ चकमकीप्रकरणी गुजरातमधील माजी पोलीस अधिकारी डी.जी.वंझारा आणि एन.के.अमिन यांना सीबीआय न्यायालयाने आज गुरुवारी 2 में रोजी दोषमुक्त केले. अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी तपास यंत्रणेने राज्य सरकारची परवानगी घेतली नव्हती आणि या आधारेच संबंधित अधिकाऱ्यांना दोषमुक्त केले जात आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
इशरत जहाँ प्रकरणी सीबीआय न्यायालयात खटला सुरु असून वंझारा आणि अमिन यांनी या आरोपांमधून मुक्त करावे, असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या खटल्याची सुनावणी सीबीआय न्यायालयातील न्या. जे के पांड्या यांच्यासमोर सुनावणी होती. वंझारा यांच्या अर्जावर युक्तिवादही झाला होता. यात इशरतची आई शमीमा कौसर यांनी वंझारा यांच्या अर्जास विरोध केला होता.
जून २००४ मध्ये मुंब्रा येथे राहणाऱ्या इशरत जहाँ (वय १९), तिचा मित्र जावेद उर्फ प्राणेश आणि मूळ पाकिस्तानी जिशान जौहर आणि अमजद अली राणा यांना तत्कालीन पोलीस महानिरीक्षक वंझारांच्या पथकाने अहमदाबादजवळील चकमकीत ठार मारले होते. मात्र, ही चकमक बनावट असल्याचा दावा सीबीआयने केला होता. या प्रकरणाशी संबंधित वंझारा हे पोलीस उपमहानिरीक्षक आणि अमिन हे पोलीस अधीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झाले होते.