नंदुरबार जिल्ह्यात परराष्ट्रातून किंवा परराज्यातून येणाऱ्या प्रवाशाला संपूर्ण लसीकरण बंधनकारक

 

नंदुरबार – कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाच्या अटी व शर्तींचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरून राज्यात, जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी केंद्र शासनाने केलेल्या सूचना लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.

लसीकरणाची व्याख्या

संपूर्ण लसीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती अशी आजारी व्यक्ती ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही

त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे.

अशी कोणतीही व्यक्ती जी १८ वर्षापेक्षा कमी वयाची आहे, ते सर्व वैध व योग्य मानले जातील.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करावा. (रूमालाला मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असेल) जेथे जेथे, शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखावे. वेळोवेळी साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात धुवावे. खोकतांना किंवा शिकतांना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाकावे आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करावे, जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वत:चा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिकावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार, अभिवादन करावे.