मागील भरतीत कॉपी प्रकरणात 50 उमेदवार झाले होते बाद
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या सन 2019 च्या (Pimpri Chinchwad Police Recruitment) भरतीत कॉपी प्रकरणात दोषी आढळल्याने तब्बल 50 उमेदवारांची झालेली निवड रद्द झाली होती. कॉपी करून पोलीस बनू पाहणाऱ्या 50 जणांना कायदेशीर प्रक्रियेला देखील सामोरे जावे लागले. मागील वेळचा अनुभव लक्षात घेता यावर्षीच्या लेखी परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अधिकची तयारी केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापनेवेळी आयुक्तालयास तोकडे मनुष्यबळ मिळाले. उर्वरित मनुष्यबळ तीन टप्प्यातील पोलीस भरतीमधून उपलब्ध होणार असल्याचे आदेशात सांगण्यात आले होते. सन 2019 मध्ये पोलीस भरतीचा 720 पदांचा पहिला टप्पा पार पडला. मात्र लेखी परीक्षेत हिंजवडी येथे एका बहाद्दराने स्मार्टपणे कॉपी केल्याचे आढळून आले. मास्कमध्ये बॅटरी, सिमकार्ड, इअरफोन आणि अन्य साहित्य फिट करून उमेदवार परीक्षा केंद्रावर जात असताना तपासणीत पकडला गेला.
त्याच्याबरोबर त्याच्या साथीदारांना देखील पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्यात देखील पोलीस भरतीत गैरव्यवहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.