चिपळूण : कोयना अवजलाच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने बारमाही वाहणाऱ्या, कोकणातील चिपळूण येथील वाशिष्टी नदीच्या तीरावर, शहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी, गोवळकोट धक्का परिसरात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ या पर्यटन कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारीचे उद्या सकाळी १०.३० वाजता ‘गोवळकोट धक्का येथे उद्घाटन होणार आहे. यावेळी नामवंत कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, लेखिका आश्लेषा महाजन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
पुण्यातील प्रसिद्ध ऑफबीट डेस्टीनेशन्स आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांनी आयोजित केलेल्या ‘चला साहित्यिकांच्या गावाला’ या विशेष सहलींतर्गत कोकणाचा आगळा-वेगळा अनुभव घेण्यासाठी आलेले ३५ पर्यटक उद्घातानंतर लगेच ‘क्रोकोडाईल सफारी’चा आनंद घेणार आहेत. ‘क्रोकोडाईल सफारीचा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असून या माध्यमातून चिपळूण आणि परिसरातील पर्यटन समृद्धीचा सुगंध सर्वदूर पसरावा हा उद्देश या मागे आहे.
मगर चिपळूणच्या पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण ठरू शकते, याची जाणीव झालेल्या चिपळूणातील पर्यटनप्रेमींनी क्रोकोडाईल सफारी सारखा उपक्रम सुरु केला आहे. आजतागायत इथल्या मगरींनी कोणावरही हल्ला केल्याचे वृत्त नाही. या मगरी ओहोटीदरम्यान वाशिष्ठीच्या किनाऱ्यावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. अगदी ८-१० फुटाच्या अंतरावरून त्या पाहण्याचा आनंदही घेता येतो.
चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्टी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावा, असा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. ‘क्रोकोडाईल सफारी’साठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात आली असून त्यांसोबत आयलंड भेट, डॅशिंग कार, अस्मानी झुले, रोइंग बोट, पॅडल बोटिंग, फनी गेम्स, फूड कोर्ट उपलब्ध असणार असून खाडीतील वातावरण पर्यटकांनी गजबजणार आहे.