नवी दिल्ली : मध्यमवर्गाच्या विकास आणि आर्थिक विकास साधण्यासाठी प्राप्तिकर रद्द करण्याची गरज आहे, असे मत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. प्राप्तिकर म्हणजे ओझं असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. हैदाराबादमध्ये इंडियन एक्झिबिशन इंडस्ट्री आयोजित आठव्या आयईआयएच्या सेमिनारमध्ये सुब्रमण्यम स्वामी बोलत होते.
मध्यमवर्गीय आणि नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्राप्तिकर अडथळ्याचं ठरत असून, प्राप्तिकर म्हणजे त्यांचा छळ आहे, असेही स्वामी म्हणाले. प्राप्तिकर रद्द केल्यास महसुलावर परिणाम होऊ नये, यासाठी सुब्रमण्यम यांनी कोळसा खाणींच्या लिलावाचा पर्याय सूचवला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजेच कोळसा खाणी किंवा स्पेक्ट्रम यांचे लिलाव करावेत, असे स्वामी म्हणाले.बेरोजगारी आणि दारिद्र्याशी सामना करण्यासाठी देशाने विकासात येत्या वर्षात 10 टक्क्यांनी वाढले पाहिजे, असे मत स्वामी यांनी मांडले.