नवी दिल्ली-भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) देणग्यांमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५९३ टक्क्यांनी वाढ झाली असून भाजपाला २०१६-१७ मध्ये ५३२.२७ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. २०१५-१६च्या आर्थिक वर्षात हा आकडा ७६.८५ कोटी रुपये इतका होता. तर दुसरीकडे गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत काँग्रेसच्या देणग्यांमध्ये १०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) यांनी संयुक्तरित्या तयार केलेल्या पाहणी अहवालात ही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे.
आकडेवारी जाहीर
एडीआर ही एनजीओ असून ही संस्था निवडणूक आणि राजकीय सुधारणांसंदर्भात काम करते. तर एनईडब्ल्यू ही संस्था निवडणूक सुधारणांसाठी देशभरात काम करते. या दोन्ही संस्थांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ या वर्षांत ज्या पक्षांना २०,००० रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या अशा पक्षांवर लक्ष केंद्रीत करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, आर्थिक वर्षात २०१६-१७ सर्व पक्षांच्या एकूण निधीत ४८७.३६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये ४७८ ट्क्क्यांनी वाढ झाली आहे.
राष्ट्रवादीच्या देणगीतही वाढ
गेल्या आर्थिक वर्षात ही वाढ १०२ टक्क्यांनी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५-१६मध्ये ७१ लाखांच्या देणग्या त्यांना मिळाल्या होत्या, यामध्ये ७९३ टक्के इतकी वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये त्यांना ६.३४ कोटींच्या देणग्या मिळाल्या होत्या. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या देणग्यांमध्ये २३१ टक्क्यांनी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या देणग्यांमध्ये १९० टक्के वाढ झाली आहे. तर सीपीआयच्या देणग्यांमध्ये ९ टक्क्यांनी घट झाली आहे. तर बहुजन समाज पार्टीला २०१६-१७मध्ये २०,००० रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळालेल्या नाहीत, असे त्यांनी जाहीर केले आहे.
तर सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ या वर्षांत २०,००० रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळालेल्या सर्व पक्षांना मिळून ५८९.३८ कोटी रुपये इतकी रक्कम त्यांना देणग्यांच्या स्वरुपात मिळाली आहे. यामध्ये सर्व पक्ष्यांच्या मिळून २,१२३ देणग्यांचा समावेश आहे. निवडणुक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, भाजपाला मिळालेल्या १,१९४ देणग्यांमधून ५३२.२७ कोटी रुपये मिळाले आहेत. भाजपा या एकट्या पक्षाला मिळालेली देणग्यांची ही रक्कम काँग्रेस, राष्ट्रवादी, सीपीआय, सीपीएम आणि तृणमूल काँग्रेस यांच्या एकत्रित देणग्यांच्या रकमेपेक्षा ९ पटीने जास्त आहे.
एडीआर-एनईडब्ल्यूच्या अहवालानुसार, २०१६-१७ या आर्थिक वर्षात सर्व राजकीय पक्षांच्या ऑडिट रिपोर्टनुसार त्यांचे एकूण उत्पन्न १,५५९.१७ कोटी रुपये आहे. तर जाहीर करण्यात आलेले देणगीदारांच्या माहितीसह सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे एकूण उत्पन्न ५८९.३८ कोटी रुपये इतके आहे. हा आकडा त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा ३७.८ टक्क्यांनी जास्त आहे.