नवी दिल्ली-भारत आणि पाकिस्तान सीमा रेषेवर नेहमीच तणावपूर्ण वातावरण असते. एकमेकांसमोर उभे ठाकणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने पहिल्यांदाच संयुक्त सराव केला. रशियातील शांघाय शहरात संयुक्त लष्करी सराव करण्यात आला. यात भारत आणि पाकिस्तानचाही समावेश आहे.
शांघाय सहकार्य संघटनेतील चीन, रशिया व अन्य देशांचे सैन्य ‘शांतता मिशन २०१८’ अंतर्गत संयुक्त सराव करत आहेत. दहशतवादाविरोधात या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. रशियात शुक्रवारपासून या लष्करी सरावाला सुरुवात झाली.
शहरी भागात दहशतवादी कारवायांविरोधात कशी मोहीम राबवावी, याचे प्रशिक्षण यात दिले जाणार असून या सरावात मॉक ड्रील देखील घेतली जाणार आहे, अशी माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली.
संयुक्त लष्करी सरावात रशियाचे सुमारे १,७०० सैनिक, चीनचे ७०० आणि भारतीय लष्कराचे २०० जवान सहभागी झाले आहेत. यात राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे.