दिसपूर- आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांब बोगीबील पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पाच किलोमीटरच्या या पूलावर रस्ते आणि रेल्वे मार्ग आहे. पायाभरणीनंतर तब्बल २१ वर्षांनी आज या पुलाचे उद्घाटन झाले आहे.
बोगीबील पूलामुळे आसामचा दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील ढेमजी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. या पूलामुळे चार तासाचा वेळ वाचणार आहे. चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पूलावरुन जाऊ शकतात अशी या पूलाची बांधणी करण्यात आली आहे.
हे आहेत या पुलाचे वैशिष्टे
१.बोगीबील पूलाची रचना स्वीडन आणि डेन्मार्कमधल्या पूलासारखी आहे.
२.युरोपियन पूलाच्या धर्तीवर बोगीबील पूलाची बांधणी करण्यात आली आहे.
३.रेल्वे आणि रस्ते मार्ग असलेला आशियातील हा दुसरा सर्वात मोठा पूल आहे. १२० वर्ष या पुलाचे आयुष्य असेल.
४.या पूलाच्या लोअर डेकवर दोन लाईनचा रेल्वे ट्रॅक असेल आणि सर्वात वरच्या डेकवर तीन मार्गी रस्ता असेल. या पूलामुळे दिल्ली ते दिब्रुगड ट्रेन प्रवासाची वेळ तीन तासांनी कमी होणार आहे.
५.४.९ किलोमीटर लांबीच्या या पूलासाठी ५,९०० कोटी रुपये खर्च आला आहे. आधी ४.३१ किलोमीटरच्या या पूलासाठी ३,२०० कोटी रुपयांचे बजेट होते.
६.२२ जानेवारी १९९७ रोजी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते या पूलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २१ एप्रिल २००२ रोजी या पूलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
७.चीनच्या सीमेजवळ असलेला हा पूल युद्ध प्रसंगात अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या पूलाची बांधणी इतकी भक्कम आहे की, यावरुन रणगाडे सुद्धा सहज जाऊ शकतात तसेच या पूलाच्या तिन्ही मार्गावर एअर फोर्सची लढाऊ विमाने सुद्धा उतरु शकतात.