नवी दिल्ली: देशातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज ७० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. काही दिवसांपासून कोरोनाची संख्या कमी होतांना दिसत असली तरी देशातील एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंताजनक आहे. जगात सर्वाधिक रुग्णांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७० लाखांच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ७४ हजार ९१८ नवे करोना रुग्ण आढळले. तर, ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या आता ७० लाख ५३ हजार ८०७ इतकी झाली आहे.
बाधितांची संख्या वाढली असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. देशातील रिकव्हरी रेट ८६ टक्के आहे. जगात हा सर्वाधिक आहे. आतापर्यंत ६० लाख ७७ हजार ९७७ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८ लाख ६७ हजार ४९६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १२.३० टक्के रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत १ लाख ८ हजार ३३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढले आहे. मागील २४ तासात १० लाख ७८ हजार ५४४ कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात ८ कोटी ६८ लाख ७७ हजार २४२ कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७० लाख ५३ हजार ८०७ इतके पॉझिटिव्ह आढळले आहे.