नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रीमंडळाने इंफाळ येथे देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा अध्यादेश २३ मे रोजी जारी केला. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केल्यानंतर क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र असलेले हे विद्यापीठ अशा प्रकारचे देशातील पहिले विद्यापीठ असेल. मागील वर्षी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ विधेयक २०१७ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अध्यादेश २०१८ सादर करण्यात आला. क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा व्यवस्थापन व क्रीडा शिक्षण यांच्यासह या विद्यापीठाचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी आपल्या २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केला होता. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी मणिपूर सरकारने इंफाळ जिल्ह्यातील कौटरुक येथे ३२५.९० एकर जमीन उपलब्ध करुन दिली आहे.