मुंबई – भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. इंग्लंडकडून भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. अवघ्या तीन दिवसांत भारताला एका डावाने पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर गेला आहेत
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २८९ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना भारताला एक डाव आणि १५९ धावांनी हार पत्करावी लागली. २०१४ च्या ओव्हल कसोटीनंतर आणि विराटच्या नेतृत्वाखालीलही भारताचा हा पहिलाच डावाने पराभव ठरला.
२०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया मालिकेत महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कसोटी संघाची जबाबदारी विराटकडे आली. त्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारताने ३७ कसोटी सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. पण इंग्लंडकडून काल झालेली मानहानी यापूर्वी झाली नव्हती.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला २०१४ च्या ओव्हल कसोटीत डावाने पराभव स्वीकारावा लागला होता. लॉर्ड्सवरील पराभव हा विराटच्या नेतृत्वाखालील पहिलाच डावाने पराभव ठरला. लॉर्ड्सवर १८ कसोटीमधील हा १२वा, तर इंग्लंडमधील ५९ कसोटींतील ३२वा पराभव ठरला.