नवी दिल्ली: कर्तारपूर कॉरिडॉरशी निगडीत अनेक महत्वपुर्ण बाबींवर अंतिम निर्णय घेण्यासाठी भारत – पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील बैठक आज रविवारी 15 रोजी वाघा बॉर्डर येथे झाली. दोन्ही देशांचे प्रतिनिधीमंडळ या बैठकीत सामील झाले. बैठकी दरम्यान भारताच्या अनेक मागण्या पाकिस्तानकडून मान्य करण्यात आल्या आहेत. त्यातील एक मोठी मागणी म्हणजे भारतातील शीख भाविकांना कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. दररोज जवळपास पाच हजार भाविक कर्तारपूर साहिब येथे जाऊन दर्शन घेऊ शकतात. याशिवाय अन्य काही मुद्दांवर देखील भारताला पाठिंबा देणार असल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे.
गुरूपर्व आणि विशेष ऐतिहासीक दिवशी दहा हजार भाविकांना दर्शनास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय भाविकांच्या प्रवेश शुल्काबाबतही चर्चा झाली आहे. पाकिस्तानकडून आश्वासन देण्यात आले आहे की, या यात्रेच्या आड भारतविरोधी कोणतीही घटना घडणार नाही. शिवाय भारत झिरो पॉइंटवर एक पुल बांधणार आहे. पाकिस्तानकडूनही असाच पुल बांधला जावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. ज्यामुळे भाविकांना जाणेयेणे सोयीचे व सुरक्षित होईल.
पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळाचे अध्यक्ष मोहम्मद फैसल यांनी या बैठकीत ८० टक्के मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. उर्वरीत मुद्यांवर सहमतीसाठी आणखी एखादी बैठक होऊ शकते. बैठक सुरू होण्याअगोदर माध्यमांशी बोलतांना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉ. मोहम्मद फैसल यांनी म्हटले होते की, पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरला चालणा देण्यासाठी पुर्णपणे कटीबद्ध आहे आणि त्यासाठी सहकार्य देखील करत आहे. गुरूद्वारा निर्मितीचे कार्य ७० टक्क्यांपेक्षा जास्त पुर्ण झाले आहे.