नवी दिल्ली-अमेरिका सीएएटीएसए या विशेष कायद्यातून भारताला सवलत मिळणार असल्याने भारताचा रशियाकडून एस – ४०० ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एकूण ३९ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार असणार आहे. सीएएटीएसए या कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्यावर निर्बंध आहेत.
भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियाबरोबर हा करार केला असता तर भारतावर आर्थिक निर्बंध लावले गेले असते. पण आता हा धोका उरलेला नाही. भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या तीन देशांना सीएएटीएसए या विशेष कायद्यातून सवलत मिळणार आहे. अमेरिकेचा दबाव असला तरी भारत रशियाकडून एस – ४०० क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्यावर ठाम आहे असे १३ जुलै रोजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले होते. त्यानंतर आता अमेरिकेने भारताला ही सवलत देण्याची तयारी दाखवली आहे.
एस-४०० मुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होईल. मागच्या दोन ते तीन वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये या व्यवहाराची बोलणी सुरु आहेत. क्षत्रूची क्षेपणास्त्रे, टेहळणी विमाने, स्टेलथ तंत्रज्ञानाने युक्त असलेली फायटर विमाने शोधून नष्ट करण्याची एस-४०० ची क्षमता आहे. ऑक्टोंबर २०१६ मध्ये गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये बैठक झाली. त्यावेळी सर्व प्रथम एस-४०० च्या व्यवहाराबाबत करार झाला होता.